गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील सोलेगाव येथे गावठी कट्टा व दोन जिवंत - काडतुसे बाळगून दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर - ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने - जेरबंद केले. ही कारवाई बुधवार (दि. १९ ऑगस्ट) रोजी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गंगापूर - हद्दीतील सोलेगाव येथे एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. संबंधित व्यक्तीने गावठी कट्ट्यासह फोटो फेसबुकवरही प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. पथकाने सोलेगाव येथे शोध घेत संशयित इसमाला ताब्यात घेऊन झडती घेतली. असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व रेडमी कंपनीचा मोबाईल असा अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने आपले नाव स्वप्निल मनोहर उमाप (वय २६, रा. सोलेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. आरोपीला जप्त मुद्देमालासह गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. दरम्यान, आरोपी स्वप्निल उमाप याच्याविरुद्ध यापूर्वीही गंगापूर पोलीस ठाण्यात घातक हत्यार बाळगणे, मारहाण करणे व धमकी देणे यासंदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक लहु घोडे तसेच पोहेकॉ सुनिल गोरे, सचिन राठोड, गोपाल पाटील, संतोष डोंगरे, बलवीरसिंग बहुरे, योगेश तरमळे, जीवन घोलप व शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.













